मानव- प्राणी संघर्षामध्ये पकडण्यात आलेले बिबळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहेत. या बिबळ्यांना वर्षभरात थोडा मोकळा श्वास घेता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बिबळ्या सफारीचा योजना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासमोर मांडण्यात येणार आहे. मंजुरीनंतर वर्षभरात बिबळ्या सफारीला सुरुवात होऊ शकेल. शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबळ्या सफारी संदर्भात ट्विट केले आणि सफारीच्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये बिबळ्या सफारीची योजना सुरक्षेच्या मुद्यावरुन फेटाळण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी मध्ये बिबळ्या सफारीच्या दोन नव्या योजनांबद्दल चर्चा सुरू झाली. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीनंतरही योजना पुढे सरकत न्हवती. मात्र वनमंत्र्यांच्या ट्विटनंतर पकडलेल्या बिबळ्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्राणिप्रेमीमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. सफारीचा माध्यमातून प्रत्यक्ष प्राण्याला पाहिल्यानंतर मानव -प्राणी संघर्ष कमी होण्यासाठी आणि प्राण्याच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्यायला पर्यटकांना मदत होईल, असे सांगण्यात येत आहे. सफारीच्या माध्यमातून नैसर्गिक जगण्याची संधी मिळाल्यास या प्राण्यांची आयुर्मयादा वाढू शकेल, असे मत वन्यजीव कार्यकर्ते सुनिश कुंजू यांनी व्यक्त केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews